रशियाने युक्रेनवरील क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याची व्याप्ती वाढविली

मॉस्को/किव्ह – रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रसंघात सुमारे 143 देशांनी निषेध नोंदविला होता. तर 35 देशांनी रशियाविरोधी मतदान न करता याबाबतच्या प्रस्तावावर तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या या ठरावावर रशियाने जोरदार टीका केली आहे. त्याचवेळी युक्रेनच्या 40 हून अधिक शहरांवर रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. यासाठी रशियाने इराणी बनावटीच्या कामाकाझी ड्रोन्सचा वापर केल्याचे वृत्त आहे. रशियाच्या या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

युक्रेनवरील

सोमवारी युक्रेनची राजधानी किव्हसह या देशाच्या इतर शहरांवर रशियाने क्षेपणास्त्रांचे घणाघाती हल्ले चढविले होते. युक्रेनचे युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच रशियाने युक्रेनवर इतका भीषण हल्ला चढविल्याचे दावे केले जातात. या हल्ल्यात युक्रेनच्या शहरांची व शहरांमधील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची वाताहत झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. युक्रेनवर हल्ला चढवून नऊ महिने झाले तरी रशियाने अद्याप या युद्धात आपल्या लष्करी क्षमतेचा वापर केला नसल्याचे दावे याआधी काहीजणांनी केले होते. पण सोमवारी चढविलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याद्वारे रशियाने युक्रेनला आपल्या सामर्थ्याची जाणीव करून दिली.

युक्रेनवरील हल्ल्याचा पहिला एपिसोड आत्ता कुठे सुरू झाल्याचे रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव्ह म्हणाले होते. तसेच पुढच्या काळातही युक्रेनवर असेच भीषण हल्ले होत राहतील, असा दावा मेदवेदेव्ह यांनी केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा युक्रेनच्या 40हून अधिक शहरांना रशियाने आपल्या क्षेपणास्त्र व कामाकाझी ड्रोन्सच्या हल्ल्याचे लक्ष केले. या शहरातील दळणवळणाच्या सुविधा या हल्ल्यांमुळे प्रभावित झाल्याचा दावा केला जातो. यासाठी रशियाने इराणी बनावटीच्या कामाकाझी ड्रोन्सचा वापर केला, ही बाब लक्षणीय ठरते. याआधी युक्रेनने सदर ड्रोन्स रशियाला पुरविणाऱ्या इराणला इशारे दिले होते. यामुळे युक्रेन व युक्रेनच्या मागे उभे राहणाऱ्या पाश्चिमात्य देशांबरोबरील इराणचे संबंध अधिकच ताणले गेले आहेत.

युक्रेनवरील

दरम्यान, आपल्या हवाई दलाने देखील रशियाच्या 25 टार्गेट्सवर 32 हल्ले चढविल्याची माहिती युक्रेनी संरक्षणदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. पण याचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत. रशिया अशारितीने क्षेपणास्त्रांचा मारा करीत असताना, युक्रेनने अमेरिका व नाटोच्या सदस्यदेशांकडे हवाई सुरक्षा यंत्रणेची मागणी केली आहे. ही मागणी मान्य होईल, असे संकेत मिळत आहेत. त्याचवेळी युक्रेनच्या नाटोतील सहभागाची पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र युक्रेनचा नाटोतील सहभाग या युद्धाचे तिसऱ्या महायुद्धात रुपांतर करणारी बाब ठरेल, असा इशारा रशियाच्या सिक्युरिटी काऊन्सिलच्या उपसचिवांनी बजावले आहे.

रशियाने युक्रेनच्या चार शहरांचा ताबा घेऊन ते रशियन संघराज्याचे भाग बनल्याची घोषणा केल्यानंतर, युक्रेनने नाटोच्या सदस्यत्त्वासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. पण युक्रेनला नाटोमध्ये सहभागी करून घेण्यावर अजूनही सर्वच नाटोच्या सदस्यदेशांचे एकमत झालेले नाही. अशा परिस्थितीत रशियाकडून युक्रेन व नाटोला देण्यात येत असलेले हे इशारे युरोपातील वातावण अधिकच ज्वालाग्रही बनवित आहेत. त्यातच रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मारा करून या युद्धाचे पारडे पुन्हा एकदा फिरविल्याने, युक्रेनच्या मागे उभे राहणाऱ्या अमेरिका व नाटोमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कारण क्षेपणास्त्रांच्या माऱ्यासमोर युक्रेन फार काळ तग धरू शकणार नाही, याची जाणीव अमेरिका व नाटोला झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनी लष्कराचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी अमेरिका व नाटोची धडपड सुरू असल्याचे दिसते आहे.

English     हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info