मॉस्को/किव्ह – रशियाच्या खेर्सन शहरातील माघारीनंतर युक्रेनी लष्कराने खेर्सनच्या इतर भागांमधील हल्ले वाढविले आहेत. या हल्ल्यांना यश मिळत असल्याचा दावाही युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पण त्याचवेळी डोन्बास क्षेत्रातील रशियाचे आक्रमण अधिक तीव्र झाल्याची कबुली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली. झेलेन्स्की यांच्या या वक्तव्यातून रशियाने डोन्बास क्षेत्रातील मोहिमेवर लक्ष अधिक केंद्रित केल्याचे संकेत मिळत आहेत.
गेल्या आठवड्यात रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी खेर्सनमधील माघारीचा निर्णय जाहीर केला होता. रशियन तुकड्या डिनिप्रो नदीतून दुसऱ्या भागात जात असल्याचे फोटोग्राफ्सही प्रसिद्ध झाले होते. पाश्चिमात्य माध्यमांनी रशियाची ही माघार म्हणजे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना मोठा धक्का असल्याचे चित्र रंगविण्यास सुरुवात केली होती. रशियन संरक्षणमंत्री तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खेर्सनमधून माघारी घेतलेल्या तुकड्या फेररचना करून इतर भागांमध्ये तैनात करण्याचे संकेत दिले होते.
या पार्श्वभूमीवर डोन्बास क्षेत्रातील डोनेत्स्क प्रांतात प्रखर लढाई सुरू होणे लक्ष वेधून घेणारे ठरते. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमधील मोहिमेला सुरुवात करताना डोन्बास क्षेत्रातील रशियन वंशाच्या जनतेला युक्रेनमधील नाझी अत्याचारांमधून सोडविणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे जाहीर केले होते. मोहिमेच्या सुरुवातीपासून रशियन फौजांनी या भागातील शहरे व महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेण्यावर भर दिला होता. युक्रेनमधील मोहिमेत राजधानी किव्ह व खार्किव्हमधून माघार घेण्यात आली असली तरी डोन्बासमधून रशियन फौजा एक इंचही मागे आलेल्या नाहीत. यावरून रशिया डोन्बास क्षेत्रातून कधीही माघार घेणार नाही, हे स्पष्टपणे दिसून आलेले आहे.
आताही खेर्सनमधून सहज माघार घेणाऱ्या रशियाने डोन्बासमधील आपल्या मोहिमेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिलेला नाही. इतर ठिकाणी माघार घेणाऱ्या रशियन फौजा या भागात प्रखर संघर्ष करीत असल्याने युक्रेनची चांगलीच कोंडी झाली असून त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेला उल्लेख त्याला दुजोरा देणारा ठरतो. झेलेन्स्की यांनी आपले लष्कर या भागात नरकाप्रमाणे असलेल्या स्थितीत लढत असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, युक्रेनमधील काही अधिकाऱ्यांनी खेर्सनमधील रशियन माघारीचा जल्लोष करु नका, असे बजावले आहे. नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेले रशियन लष्करा प्रखर हल्ले चढवून जेरीस आणू शकते, असा इशारा युक्रेनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. रशियन लष्कराने खेर्सन शहरातून माघार घेतली आहे मात्र ते खेर्सन प्रांतातील इतर भागांसाठी संघर्ष सुरू ठेवणार असल्याकडे युक्रेनी अधिकारी लक्ष वेधत आहेत.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |