माकिव्हकामधील युक्रेनच्या रॉकेट हल्ल्यानंतर रशियाने केलेल्या प्रतिहल्ल्यांमध्ये दोनशे युक्रेनी जवानांसह 350 जणांचा बळी

- युक्रेनकडून खेर्सनमध्ये नव्या हल्ल्याचा दावा

मॉस्को/किव्ह – डोनेत्स्कमधील माकिव्हका शहरात युक्रेनने केलेल्या हल्ल्यांचे तीव्र पडसाद अद्यापही रशियन वर्तुळात उमटत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी विशेष बैठक घेऊन लष्करातील जवानांना मिळणारी वागणूक व या मुद्यावर होणाऱ्या टीकेची दखल घेतल्याचे सांगण्यात येते. या बैठकीनंतर रशियन संरक्षण विभागाने माकिव्हकामधील हल्ल्याबाबत सुधारित निवेदन जारी केले आहे. त्याचवेळी रशियन लष्कराने डोनेत्स्क प्रांतामधील युक्रेनच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले केले असून त्यात सुमारे 350 जणांचा बळी गेल्याचे सांगण्यात येते. तर युक्रेनने खेर्सनमध्ये नवा हल्ला केल्याचा दावा केला असून रशियन भूभागात अधिक खोलवर हल्ले चढविले जातील, असे बजावले आहे.

350 जणांचा बळी

रविवारी रात्री डोनेत्स्क प्रांतातील रशियन नियंत्रणाखालील माकिव्हका शहरात युक्रेनने जबरदस्त रॉकेट हल्ले चढविले होते. युक्रेनी लष्कराने शहरातील लष्करी इमारतीवर सहा ‘हायमार्स’ रॉकेटस्‌‍चा मारा केला होता. या माऱ्यात संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली होती. या इमारतीत रशियन लष्करात नव्याने भरती झालेल्या जवानांची तुकडी तैनात होती. त्याचवेळी तळमजल्यावर मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठाही होता. सदर हल्ल्यात रशियाचे तब्बल 400 जवान मारले गेल्याचा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला होता. यावरून रशियन वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

350 जणांचा बळी

सुरुवातीला रशियाच्या संरक्षण विभागाने यात 63 रशियन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र अवघ्या 24 तासांमध्ये नवी अपडेट जारी करीत सुमारे 90 जवानांचा मृत्यू झाला असून अधिक माहिती नंतर देण्यात येईल, असे निवेदन संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आले. माकिव्हकामधील मोठ्या जीवितहानीनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी संरक्षण विभागाची बैठक घेऊन रशियन जवानांना मिळणारी वागणूक व संबंधित मुद्यांवर आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुतिन यांच्या या बैठकीनंतर रशियन फौजांनी डोनेत्स्क प्रांतात मोठे हल्ले केल्याचे सांगण्यात येते.

350 जणांचा बळी

या हल्ल्यांमध्ये माकिव्हकामधील जीवितहानीसाठी कारणीभूत असणाऱ्या ‘हायमार्स सिस्टिम्स’ना लक्ष्य करण्यात आले. चार हायमार्स लाँचर्स व 800 रॉकेट प्रोजेक्टाईल्स नष्ट करण्यात आल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली. ड्रुजकोव्हका भागातील या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे जवळपास दोनशे जवान मारले गेल्याचे रशियाकडून सांगण्यात आले. त्याचवेळी मॅस्लोव्हका भागातील परदेशी जवानांच्या तुकडीवरही कारवाई करण्यात आली. यात 130हून अधिक परदेशी जवान मारले गेल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली. डोनेत्स्क प्रांतातील क्रॅमाटोर्स्क भागात क्षेपणास्त्र तसेच रॉकेटहल्ले करण्यात आल्याचेही समोर येत आहे.

दरम्यान, युक्रेनने माकिव्हकापाठोपाठ खेर्सनमध्येही मोठ्या हल्ल्याचा दावा केला आहे. यात 500 रशियन जवान मारले गेले असावेत, असे युक्रेनी यंत्रणा व माध्यमांनी म्हटले आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरच युक्रेनचे गुप्तचर प्रमुख किरिल बुदानोव्ह यांनी, पुढील काळात रशियाच्या भूभागात खोलवर हल्ले करण्यात येतील असा इशारा दिला. यात क्रिमिआ प्रांताचाही समावेश असेल, असेही बुदानोव्ह यांनी बजावले. यापूर्वी करण्यात आलेल्या हल्ल्यांसाठी युक्रेनला अमेरिकेची मोठ्या प्रमाणात मदत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info