वॉशिंग्टन – ब्लॅक सी’च्या क्षेत्रात रशियाच्या लढाऊ विमानाने अमेरिकेचे ‘एमक्यू-9 रिपर’ ड्रोन पाडून खळबळ माजविली. यावर अमेरिकेतून जहाल प्रतिक्रिया येत आहेत. अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी पुढच्या काळात अमेरिकेने रशियाची लढाऊ विमाने पाडून टाकण्याचा कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. रोनाल्ड रीगन यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर असते तर त्यांनी तसेच केले असते, असा दावा ग्राहम यांनी केला. मात्र रशियाच्या विमानांवर हल्ले झाले तर ती युद्धाची घोषणा मानली जाईल, सिनेटर ग्राहम यांना अमेरिका व रशियामध्ये अणुयुद्ध पेटवायचे आहे, अशी घणाघाती टीका रशियाच्या अमेरिकेतील राजदूतांनी केली आहे.
ब्लॅक सीच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात अमेरिकेचे ‘एमक्यू-9 रिपर’ ड्रोन गस्त घालत होते व त्यावेळी रशियाच्या लढाऊ विमानाने हे ड्रोन पाडल्याचा आरोप अमेरिका करीत आहे. पण रशियाने मात्र सदर ड्रोन आंतरराष्ट्रीय हद्दीत नव्हते, असा खुलासा केला आहे. त्याचवेळी हे प्रकरण चिघळणार नाही, याची दक्षता रशिया व अमेरिका घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अमेरिकेतील काहीजणांनी युक्रेनच्या युद्धात अमेरिकेने थेट रशियाशी लष्करी संघर्ष पेटेल इतका पुढाकार घेऊ नये, असा इशारा दिला होता. मात्र अमेरिकेतील रशियाविरोधी गट राष्ट्राध्यक्ष बायडेन व त्यांचे प्रशासन कमकुवतपणा दाखवित असल्याचे सांगून त्यावर नाराजी व्यक्त करीत आहेत.
अमेरिकेचे ड्रोन पाडणाऱ्या रशियाला यासाठी जबाबदार धरलेच पाहिजे. आपल्यासाठी धोकादायक ठरणारे प्रत्येक रशियन विमान पाडण्याचा निर्णय अमेरिकेने घ्यायला हवा होता. रोनाल्ड रीगन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर असते तर त्यांनी तसेच केले असते. पण सध्याच्या काळात अमेरिकेच्या धोरणात फार मोठी पडझड झालेली आहे, अशी खंत सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी व्यक्त केली. अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिनेटर ग्राहम यांनी केलेल्या या वक्तव्यांचे तीव्र पडसाद उमटले. अमेरिकेतील रशियाचे राजदूत अनातोली ॲन्टानोव्ह यांनी सिनेटर ग्राहम यांना अमेरिका व रशियामध्ये अणुयुद्ध पेटवायचे आहे, असा ठपका ठेवला.
रशियाची लढाऊ विमाने पाडण्याचा प्रयत्न केला तर ती युद्धाची घोषणा मानली जाईल. यामुळे रशिया व अमेरिकेमध्ये युद्ध पेट घेईल आणि त्याचे पर्यावसन अणुयुद्धात होईल. सिनेटर ग्राहम यांना अणुयुद्ध हवे आहे का, यासाठी अमेरिकन मतदारांनी त्यांना निवडून दिलेले आहे का, असे प्रश्न रशियन राजदूतांनी केले आहेत.
दरम्यान, रशियाने ड्रोन पाडल्यानंतरही अमेरिका अधिकृत पातळीवर आक्रमक प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. उलट यामुळे युक्रेनच्या युद्धात अमेरिकेने आणखी किती पुढे जायचे, यावर विचार करण्याची वेळ आल्याचे काही अमेरिकी संसद सदस्य सांगू लागले आहेत. तर ब्लॅक सीच्या क्षेत्रात आपले ड्रोन धाडून अमेरिकेने युक्रेनच्या युद्धात आपण थेटपणे गुंतलो आहोत, हे जगाला दाखवून दिल्याची टीका रशियाने केली आहे. मात्र काही झाले तरी या युद्धात आपली थेट लष्करी टक्कर होणार नाही, याची दक्षता रशिया व अमेरिका घेत असल्याचे यामुळे समोर आले आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन आणि रशियाचे संरक्षणमंत्री सर्जेई शोईगू यांची या प्रकरणी चर्चा सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दोन्ही देश चिघळणार नाही, यासाठी सावधपणा दाखवित असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. मात्र पुढच्या काळात अशा स्वरूपाची घटना घडली तर त्याचे संघर्षात रुपांतर होण्यास वेळ लागणार नाही, अशी चिंता जगभरातून व्यक्त करण्यात येत आहे. रशियाने याआधीच तसे इशारे दिले होते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |