वॉशिंग्टन – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतिन यांनी युक्रेनवर अणुहल्ला चढवलाच तर अमेरिका व नाटो मिळून रशियन सैन्य उद्ध्वस्त करतील, अशी धमकी ‘सीआयए’चे माजी प्रमुख डेव्हिड पेट्रॉस यांनी दिली. युक्रेन अजूनही नाटोचा सदस्यदेश नसला, तरी रशियाच्या युक्रेनवरील अणुहल्ल्याचे परिणाम नाटोच्या सदस्यदेशांना सहन करावे लागतील. त्यामुळे रशियाच्या अणुहल्ल्याविरोधात अमेरिका व नाटो रशियाच्या विरोधात नक्कीच कारवाई करू शकतात, असे पेट्रॉस यांनी बजावले आहे. युक्रेनच्या युद्धाचे पारडे फिरले असून यामुळे अस्वस्थ झालेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष टोकाचा निर्णय घेऊ शकतात, असा इशाराही डेव्हिड पेट्रॉस यांनी दिला आहे.
युक्रेनचे चार प्रांत तोडून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी हे प्रांत आता रशियन संघराज्याचा भाग बनल्याचे घोषित केले. रशियन संसदेनेही या निर्णयाला मान्यता दिली आहे. त्याचवेळी युक्रेनच्या लष्कराने रशियाविरोधात मुसंडी मारली असून रशियन सैन्य युक्रेनच्या काही भागातून माघार घेत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियन आक्रमणाच्या विरोधात आपल्या देशाला अधिक चांगल्यारितीने तयार केले. लष्करी भरती सुरू करून अल्पावधित लष्करी प्रशिक्षण देण्यात तसेच लष्करी हालचालींमध्येही युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियाला मागे टाकले, असा दावा सीआयएचे माजी प्रमुख डेव्हिड पेट्रॉस यांनी केला. यामुळे रशियाला युक्रेनच्या लष्करासमोर माघार घ्यावी लागत असल्याचे दावे पेट्रॉस यांनी एका अमेरिकी वृत्तवाहिनीवर केले.
यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अस्वस्थ झाले असून ते थेट अणुयुद्धाच्या धमक्या देत आहेत. त्यांच्या या धमक्या अतिशय गांभिर्याने घेण्याची आवश्यकता आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनवर अणुहल्ला चढविलाच, तर त्याचा प्रत्युत्तर दिल्याखेरीज अमेरिका स्वस्थ बसणार नाही. अमेरिका व नाटो मिळून रशियन सैन्य उद्ध्वस्त करील, असा इशारा पेट्रॉस यांनी दिला. युक्रेन नाटोचा सदस्यदेश नसला तरी युक्रेनवरील अणुहल्ल्याचे विपरित परिणामा नाटोचे सदस्य असलेल्या युरोपिय देशांवर होतील. अशा परिस्थितीत अमेरिका व नाटोला रशियाला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार असेल, असे सांगून डेव्हिड पेट्रॉस यांनी रशियाला परिणामांची जाणीव करून दिल्याचे दिसत आहे.
याआधी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी रशियाच्या भूभागावरील हल्ल्याला अणुहल्ल्याने प्रत्यत्तर दिले जाऊ शकते, असे बजावले होते. विशेषतः युक्रेनपासून तोडलेले चार प्रांत आता रशियन संघराज्याचा भाग बनले असून त्यांच्यावरीह हल्ला हा रशियावरील हल्ला मानला जाईल. आपल्या भूभागाच्या सुरक्षेसाठी रशिया अणुहल्ला देखील चढवू शकतो, असे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी घोषित केले होते. त्यानंतर अमेरिकेने रशियापर्यंत गोपनीय संदेश पाठवून अणुहल्ल्याच्या विरोधात इशारे दिल्याचे दावे काही अमेरिकी वर्तमानपत्रांनी केले होते. पण याचे तपशील उघड करण्यात आले नव्हते. आता सीआयएचे माजी प्रमुख असलेल्या डेव्हिड पेट्रॉस यांच्याद्वारे रशियाला अणुहल्ल्याच्या विरोधात उघडपणे धमकी दिली जात आहे. यामागे युक्रेनचा उत्साह वाढवून युरोपिय देशांना आश्वस्त करण्याची अमेरिकेची योजना असल्याचे दिसते.
सध्या युक्रेनच्या नाटोतील सहभागावरून अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात तसेच नाटोच्या सदस्यदेशांमध्येही तीव्र मतभेद आहेत. युरोपिय देश युक्रेनला अपेक्षित सहाय्य करीत नसल्याचा ठपका ठेवून अमेरिकेने यासाठी युरोपिय देशांवर दबाव वाढविला आहे. त्यातच रशियाकडून दिल्या जाणाऱ्या अणुयुद्धाच्या धमक्या युरोपिय देशांची धडधड वाढवित आहेत. जर्मनीसारख्या नाटोच्या सदस्यदेशाकडून याविरोधात प्रतिक्रिया आली आहे. युक्रेनच्या युद्धाची व्याप्ती वाढून हे युद्ध इतर देशांमध्ये सुरू होता कामा नये, असे जर्मनीच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. अशा परिस्थितीत अमेरिका रशियाने दिलेल्या अणुहल्ल्याच्या विरोधात अधिक आक्रमक भूमिका स्वीकारीत असल्याचे दिसते. ही बाब युरोपिय देशांच्या चिंतेत अधिकच भर टाकणारी ठरते.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |