रशियन लष्कराकडून पूर्व व दक्षिण युक्रेनमध्ये प्रखर हल्ले

- युक्रेनने ‘वॅग्नर ग्रुप’च्या तळावर केलेल्या रॉकेटहल्ल्यात मोठ्या जीवितहानीचा दावा

मॉस्को/किव्ह – कडक हिवाळा सुरू झाल्यानंतर रशिया व युक्रेनमधील संघर्ष थंडावू शकतो, असा दावा पाश्चिमात्य यंत्रणा तसेच विश्लेषकांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात दोन्ही बाजूंकडून परस्परांवरील हल्ले अधिक प्रखर होत असल्याचे दिसत आहे. रशियाने गेल्या 24 तासांमध्ये पूर्व व मध्य युक्रेनमध्ये जोरदार मारा केल्याचे समोर आले आहे. तर युक्रेनकडून ‘वॅग्नर ग्रुप’ या रशियाच्या लष्करी कंत्राटदार कंपनीचा तळ लक्ष्य करण्यात आला. त्याचबरोबर झॅपोरिझिआमध्ये केलेल्या हल्ल्यात रशियाचे 200 जवान मारल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे.

युक्रेनमध्ये

रशियाने गेल्या काही दिवसांमध्ये युक्रेनच्या दक्षिण तसेच मध्य भागात नवे हल्ले सुरू केले आहेत. शनिवारी ओडेसा बंदराला लक्ष्य केल्यानंतर रविवारी मध्य युक्रेनमधील डिनिप्रोपेट्रोव्हस्क प्रांतात रणगाडे व तोफांच्या हल्ल्यासह ग्रॅड रॉकेट्सचा मारा करण्यात आला. यात युक्रेनच्या काही लष्करी ठिकाणांसह पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

युक्रेनमध्ये

दुसऱ्या बाजूला पूर्व युक्रेनमध्येही रशियाकडून जोरदार हल्ले सुरू आहेत. रशियाने खेर्सनमधील रणगाड्यांची एक डिव्हिजन पूर्व युक्रेनमध्ये तैनात केल्याची माहिती समोर आली आहे. डोनेत्स्कमधील मोक्याचे शहर असणाऱ्या बाखमतला रशियन फौजांनी वेढा दिल्याचेही सांगण्यात येते. पूर्व भागातील आघाडीवरची लढाई दिवसेंदिवस अधिक कठीण होत चालल्याची कबुली युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दिली.

युक्रेनमध्ये

रशियाबरोबरच युक्रेननेही प्रतिहल्ल्यांची व्याप्ती वाढविण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. गेल्या 48 तासांमध्ये लुहान्स्क, झॅपोरिझिआ तसेच क्रिमिआमध्ये युक्रेनी फौजांनी हल्ले चढविले. झॅपोरिझिआ प्रांतातील मेलिटपोल शहरात असलेला रशियाचा लष्करी तळ रॉकेट हल्ल्यात लक्ष्य करण्यात आला. या हल्ल्यात रशियाचे जवळपास 200 जवान मारले गेल्याचा दावा युक्रेनी यंत्रणांनी केला.

युक्रेनमध्ये

लुहान्स्क प्रांतातील कॅडिव्हकामध्ये युक्रेनी लष्कराने एक हॉटेल रॉकेट हल्ल्यात उद्ध्वस्त केले. हे हॉटेल रशियातील खाजगी लष्करी कंपनी असलेल्या ‘वॅग्नर ग्रुप’चा तळ होता, असा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांनी केला. हल्ल्यात अनेक जणांचा बळी गेल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र त्याची आकडेवारी देण्यात आलेली नाही. यापूर्वीही युक्रेनी लष्कराने वॅग्नर ग्रुपचे तळ उडवून दिल्याचे दावे केले होते. लुहान्स्कपाठोपाठ झॅपोरिझिआमधील मेलिटपोल शहरात असलेल्या रशियन तळालाही लक्ष्य करण्यात आले. यात रशियाचे 200 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला.

दरम्यान, गेल्या तीन दिवसात रशियाची राजधानी मॉस्कोनजिक असणाऱ्या दोन मोठ्या मॉल्समध्ये आग लागून ते खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात खिम्कीमधील मेगा शॉपिंग सेंटरला आग लागून हे सेंटर जळून खाक झाले होते. यात एकाचा बळी गेला होता. सोमवारी पहाटे बालाशिखामधील ‘स्टोरीपार्क मॉल’मध्ये प्रचंड मोठी आग भडकल्याचे फोटोग्राफ्स समोर आले आहेत. या दोन्ही मॉल्सच्या आगीमागे युक्रेनचा हात असल्याचे दावे काही रशियन माध्यमांनी केले आहेत. रशियावरील या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, रशियन कंपन्यांनी प्रगत शस्त्रांच्या निर्मितीचे प्रमाण तसेच वेग वाढविल्याची माहिती रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी दिली.

English      हिंदी

या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:

https://twitter.com/WW3Info
https://www.facebook.com/WW3Info