मॉस्को/किव्ह – अमेरिका व मित्रदेशांच्या युक्रेनमधील योजनांची गोपनीय माहिती उघड होत असतानाच रशियाने युक्रेनी लष्करावरील आपले हल्ले अधिक तीव्र केले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये रशियन फौजांनी युक्रेनच्या ताब्यातील डोनेत्स्क प्रांतासह खार्किव्ह तसेच झॅपोरिझिआत मोठे हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे सुमारे साडेचारशे जवान ठार झाल्याचे रशियन संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. तर झॅपोरिझिआतील हल्ल्यात लष्करी इंधनसाठा तसेच शस्त्रसाठा उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, ‘पेंटॅगॉन लीक’च्या पार्श्वभूमीवर युक्रेनने रशियाविरोधातील प्रतिहल्ल्यांच्या मोहिमेत बदल केल्याचे वृत्त ‘सीएनएन’ या अमेरिकी वृत्तवाहिनीने दिले.
एप्रिल किंवा मे महिन्यात युक्रेन रशियाविरोधात प्रतिहल्ले सुरू करेल, असे दावे युक्रेन तसेच पाश्चिमात्य देशांकडून करण्यात येत होते. मात्र युक्रेनच्या लष्कराने सध्या बाखमतचा बचाव व रशियन प्रांतातील घातपाती हल्ल्यांवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. यामागे युक्रेनी लष्कराकडील घटलेला शस्त्रसाठा व रसद हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. बाखमत शहरातील बहुतांश भाग रशियन लष्कर व ‘वॅग्नर ग्रुप’च्या ताब्यात असून युक्रेनचे लष्कर एका भागापुरते मर्यादित राहिल्याचे समोर आले आहे. बाखमतच्या संपूर्ण नियंत्रणासाठी रशिया ‘स्कॉर्च्ड अर्थ’चे धोरण राबवित असल्याचा दावा युक्रेनी अधिकाऱ्यांकडून करण्यात येतो.
याच पार्श्वभूमीवर रशियाने युक्रेनच्या इतर भागांमधील हल्ल्यांची तीव्रता पुन्हा वाढविण्यास सुरुवात केली आहे. रविवारी रशियन फौजांनी डोनेत्स्कमधील लिमन शहर व खार्किव्ह प्रांतातील कुपिआन्स्कच्या दिशेने जोरदार हल्ले चढविले. लिमन शहरावरील हल्ल्यात युक्रेनचे १२० जवान ठार झाले असून सशस्त्र वाहने, हॉवित्झर तसेच आर्टिलरी सिस्टिम नष्ट करण्यात आली. डोनेत्स्क शहराजवळ झालेल्या संघर्षात रशियाने युक्रेनच्या सुमारे ३०० जवानांना ठार केल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली. यासाठी लढाऊ विमाने व ‘हेवी फ्लेमथ्रोवर्स सिस्टिम’चा वापर करण्यात आला.
खार्किव्ह प्रांतातील कुपिआन्स्कजवळ युक्रेनी लष्कराची आगेकूच रोखण्यात रशियन फौजांना यश मिळाले. यात युक्रेनचे ३० जवान ठार झाले असून शस्त्रसाठा नष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात येते. झॅपोरिझिआ प्रांतात रशियाच्या लढाऊ विमानांनी चढविलेल्या हल्ल्यात युक्रेनी लष्कराचा मोठा इंधनसाठा उद्ध्वस्त करण्यात आला. युक्रेनच्या या तळावर ७० हजार टन इंधन होते, असे रशियाकडून सांगण्यात आले. याव्यतिरिक्त क्षेपणास्त्रे व आर्टिलरी वेपन्सचा समावेश असलेले शस्त्रभांडारही नष्ट करण्यात आल्याचा दावा रशियन सूत्रांनी केला.
गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या संरक्षण विभागाशी निगडित गोपनीय कागदपत्रे लीक झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या लीकमध्ये अमेरिका व मित्रदेशांच्या युक्रेनमधील सहभागाचाही समावेश होता. अमेरिकेतील या लीकच्या पार्श्वभूमीवर युक्रेनने रशियावरील संभाव्य प्रतिहल्ल्यांच्या योजनेत बदल केले आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी यासंदर्भात आदेश दिले. अमेरिकेतील आघाडीची वृत्तवाहिनी ‘सीएनएन’ने यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली.
या बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:
https://twitter.com/WW3Info | |
https://www.facebook.com/WW3Info |